प्रगतीमागची प्रवृत्ती
पुरस्कारामागची व्यक्ती...

अरुण गणपती लाड

प्रमुख, क्रांती उद्योग आणि शिक्षण समूह.

 
{{item.name}}

{{selected[0].item.name}}


अरुण गणपती लाड

अरुण लाड यांचा जन्म 29 ऑक्टोबर, 1947 रोजी सांगली जिह्यातील पलूस तालुक्यातील कुंडलच्या सामाजिक कार्यकर्त्या शेतकरी कुटुंबात व येलूर (ता. वाळवा) या आजोळी झाला. सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड हे त्यांचे वडील तर क्रांतिवीरांगना विजयाताई लाड या त्यांच्या आई होत. अरुण लाड हे लहानथोरामध्ये अण्णा या जनसामान्यातील नावाने सुपरिचीत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंडल (सांगली)च्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण कुंडलच्याच प्रतिनिधी हायस्कूल मधून पूर्ण झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता उत्तम शेती व समाजकार्य करणे पसंत केले.


वैचारिक प्रभाव

क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड ह्यांचे सातारा प्रतिसरकारमधील सामाजिक उपक्रम व छोडो भारत आंदोलनातील क्रांतिकारक कार्याचा तसेच राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि विशेषतः सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले या सामाजिक सुधारकांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव अरुणअण्णांच्या जीवन कार्यावर पडला.
साताराचे प्रती सरकारचे सामाजिक कार्य, क्रांतीसिंह नाना पाटील, क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड आणि भारत छोडो आंदोलनात त्यांचे महान कार्य.


शैक्षणिक कार्य

• स्वातंत्र्य चळवळीतून प्रेरणा घेऊन स्थापना झालेल्या क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार व विकसित झालेल्या तसेच स्वावलंबन, स्वाभिमान, स्वदेशप्रेम हे ब्रीद असलेल्या गांधी एज्युकेशन सोसायटीचे संचालक, समन्वय समितीचे सचिव आणि सध्या अध्यक्ष म्हणून कार्यरत, नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत.
• सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात गांधी एज्युकेशन सोसायटीमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा व महाविद्यालयातून सर्वसामान्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून आग्रही
• ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून गांधी एज्युकेशन सोसायटीमार्फत प्राथमिक शाळेची सुरुवात करण्यात पुढाकार
• ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण अल्पखर्चात उपलब्ध व्हावे म्हणून महाविद्यालयाची सुरुवात.
• गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलची स्थापना.
• सर्वसामान्यांची शिक्षण व्यवस्था टिकावी यासाठी आंदोलने, मेळावे, चर्चासत्रे, आदींचे आयोजन करण्यात पुढाकार.

पुरस्कार - सन्मान

• महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार 2007
• अँड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते अविष्कार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार 2007
• सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचा राष्ट्रभाषा सेवक पुरस्कार 2015
• आधार सोशल संस्थेचा आधार महाराष्ट्रभूषण पुरस्कार 2016
• श्री. ल. वि. तथा बाळासाहेब गलगले सामाजिक विकास मंडळ, सांगली यांचा कै. मा. बाळासाहेब गलगले स्मृती सेवा पुरस्कार 2016
• मन फाउंडेशन, वारंगा फाटा यांच्यावतीने दिला जाणारा वनश्री पुरस्कार 2018

गौरवग्रंथः

क्रांतिशलाका - मा. अरुणअण्णा लाड गौरव ग्रंथ

आत्मकथनः अरुण लाड

ध्यासपर्व - क्रांतिविचारांचे व्रत

सामाजिक कार्य'


वृक्षारोपण, संवर्धन व संरक्षण उद्दिष्ट्ये :

1) जागतिक तापमान वाढीची समस्या दूर करण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे याचे समाजाला भान करून देणे.
2) समाजाकडूनच पर्यावरणास हानी पोहचवणाऱ्या दुष्टप्रवृत्तीस आळा घालण्यासाठी जागृती निर्माण करणे.
3) वृक्ष संवर्धन ही सामाजिक बांधिलकी असल्याची जनमानसात जागृती करणे.


वृक्षारोपण, संवर्धन व संरक्षण यासंबंधी अरुण लाड ह्यांची भूमिका

वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा उपक्रम आजच्या पर्यावरणाचा विचार करता मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. 1947 साली देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारताची लोकसंख्या अवघी 33 कोटी होती आणि वनाचे क्षेत्र 35.36 टक्के होते. पर्यावरणाचे संतुलन होते. त्यामुळे पाऊसमान नियमित होता. मिळणाऱ्या शेती उत्पादनात शेतकरी सुखी आणि आनंदी होता. लोकसंख्या वाढीबरोबर नागरिकरणाला आणि उद्योगाला लागणाऱ्या जागेसाठी वृक्षतोड वाढली. जागेची गरज भागविण्यासाठी जंगले तोडली. परंतु, वृक्ष तोडत असताना वृक्ष लागवड आणि संवर्धनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही. 33 कोटी लोकसंख्येवरून 2017 पर्यंत लोकसंख्या 125 कोटीपर्यंत वाढली. जंगलाचे क्षेत्र मात्र 35 टक्केवरून 10 टक्के पर्यंत खाली आले. पाऊस अनियमितपणे आणि हानिकारक पद्धतीने पडतो आहे. पावसाच्या या अनियमितपणामुळे दुष्काळ आणि तापमान यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. मा. पंतप्रधानांनी 100 कोटी वृक्ष लागवडीची हाक दिली आहे. त्या हाकेला प्रतिसाद देत माझ्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. वृक्ष लागवडीपुरता हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता संरक्षणासाठी कुंपण आणि संवर्धनासाठी पुढील तीन वर्षे पाणी देण्याची सोय करून झाडे जगवणेही त्यामध्ये समाविष्ठ केले आहे. या उपक्रमातून सत्तर हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचे नियोजन केले आहे.


क्रांती कृषी प्रदर्शन


मा. अरुणअण्णा ह्यांच्या एकूण कार्याचा शेती आणि शेतकरी यांची समृद्धी आणि प्रगती हाच केंद्रबिंदू राहिला आहे. शेतीची उत्पादकता वाढावी, शेतीचा उत्पादन खर्च कमीत कमी व्हावा, शेतक-यांनी शेतीमध्ये आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, शेतकऱ्यांना शेतीसाठी खते, बी-बियाणे, औषधे, कीटकनाशके कमीत कमी किंमतीमध्ये उपल्ध व्हावीत ह्या ध्यासाने ते सतत क्रियाशील आहेत. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु, कृषी विद्यापीठातून होणारे संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सहजा सहजी पोहचत नाही. ही अरुणअण्णांची खंत दूर करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते.


पदवीधर मतदार नोंदणी

2002 पासून पुणे ग्रॅज्युएट व्हाटर्स असोसिएशनमध्ये 183000 पेक्षा अधिक पदवीधर मतदार नोंदणी


विधायक उपक्रमांतून वाढदिवस

• हारतुरे, शाल-श्रीफळ, फ्लेक्स बोर्ड, वर्तमान पत्रांतून जाहिराती, विशेष पुरवणी, आदी अनावश्यक खर्चांना फाटा देऊन वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमातून साजरे करण्यात येतात. विशेषतः पर्यावरणाचा ढासळलेला समतोल विचारात घेऊन 70 गावात 71 हजार वृक्षलागवड व संवर्धन, संगोपन करून एक वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला. वाढदिवसानिमित्त स्त्रीभृण हत्या विरोधी जनजागृती, वाचनसंस्कृतीची जोपासना, मतदान हक्क जागृती, आदी संबंधी विचारवंताची प्रबोधनपर व्याख्याने, प्रभातफेऱ्या यासारखे कार्यक्रमांचे आयोजन.
• सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, हागणदारीमुक्त गाव, निर्मलग्राम, तंटामुक्त गाव, पूरग्रस्त व दुष्काळग्रस्तांना मदत, सर्वसामान्यांना वैयक्तिक अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, यासारखे समाजहिताचे कार्यक्रम वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यासाठी अरुणअण्णा नेहमीच आग्रही राहिले आहेत.

सामाजिक बांधिलकी

व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मुलन ,हागणदारीमुक्त गाव,निर्मलग्राम ,तंटामुक्त गाव ,पूरग्रस्त व दुष्काळग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात .पर्यावरण रक्षणासाठी वृक्षाची लागवड व संवर्धन करणे तसेच गोरगरीब सर्वसामान्यांच्या वैयक्तिक अडी -अडचणी सोडवण्याबरोबरच समाजहिताचे कार्यक्रम राबवण्यासाठी अरुण (अण्णा ) नेहमीच आग्रही राहिले आहेत .

क्रांतिअग्रणी पुरस्कार व व्याख्यानमाला:

• क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ह्यांच्या जयंतीदिनी रचनात्मक व समाज परिवर्तनाच्या कार्यात अलौकिक योगदान दिलेल्यांना क्रांतिअग्रणी पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम अरुणअण्णांनी सुरू केला.
• क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड ह्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी 1 ते 3 डिसेंबर या काळात महत्त्वाच्या विषयावरील मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन अरुणअण्णांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते.

राजकीय वाटचाल

• मा. अरुणअण्णा लाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. यापूर्वी त्यांनी सांगली जिल्हा उपाध्यक्ष, प्रांतिकचे सदस्य म्हणून कार्य केले आहे.
• साम्यवादी विचारांचा प्रभावः विद्यार्थीदशेत पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संघटन, प्रारंभीच्या काळात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार साम्यवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी लोकसंघटन, लोकप्रबोधन, लोकलढ्यात हिरिरीने पुढाकार व भागीदारी केली.
• राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यः दिनांक 13 जून 2005 रोजी शेतकरी आणि कष्टकऱ्यांना न्याय दूवू शकणारे नेतृत्व म्हणून मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत सांगली जिल्ह्यातून पक्षाचे दहा हजार सदस्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
• पक्षबांधणी साठी योगदानः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तळागाळापासून बांधणी व्हावी म्हणून त्यांनी प्रबोधन, शिबिरांचे आयोजन, जनसंपर्क अभियान, युवकांचे संघटन केले आहे.
• पदवीधर मतदार नोंदणीः पुणे पदवीधर मतदार संघात विशेष अभियानाव्दारे 1 लाख 83 हजार पेक्षा जास्त पदवीधर मतदारांची सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या पाच जिह्यांतून नोंदणी केली.

समाजकारणासाठी राजकारणः

• शाश्वत शेतीसाठीः नियमित व परवडणाऱ्या दराने वीज, पाणी पुरवठा व्हावा, खते व बी-बियाणे वेळेत मिळावीत यासाठी शेतकऱ्यांच्या मोर्चांचे संघटन व नेतृत्व
• महागाई विरोधी संघर्षः सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था सक्षम व कार्यक्षम करावी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा व नियमित पुरवठा व्हावा, काळाबाजार रोखण्यात यावा, आदीसाठी आंदोलने
• बेरोजगारांसाठी संघर्षः बेकारीचा प्रश्न विशेषतः पदवीधर बेरोजगारांच्या न्याय्य हक्कांसाठी पदवीधरांचे संघटन, तालुकापातळीपासून ते राज्यपातळीपर्यंतच्या आंदोलनात सक्रीय सहभाग.

विचारधारा

“ विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने प्रयत्न करावेत व तांत्रिक व्यावसायिक शिक्षण घेऊन उमेदीने स्वयंरोजगार करून बेकारीच्या संकटावर मात करावी आणि समाजाच्या प्रगतीसही हातभार लावावा, त्याशिवाय तरणोपाय नाही.”

“अनेकांनी चालबाजीने किंवा नको त्या पद्धती वापरून थोड्याशा कष्टाने राजकारण साधले, पदे मिळवली, सत्ता मिळवली. असले राजकारण करावे असेही कधी वाटले नाही आणि तशा राजकारणाने आम्हास शिवलेही नाही.”

“बापूंचे सगळे समर्पित जीवन आदर्श म्हणून डोळ्यासमोर असल्याने तशीच जीवन पद्धती स्वीकारणे पसंद केले.”

“इतक्या ऐतिहासिक अडचणी क्रांतीच्या उभारणीत आणल्या गेल्या तरीही क्रांतीची निर्मिती झाली. तो कारखाना देशात एक नंबर ठरला पाहिजे. त्यासाठी खूप कष्ट घेतले. आज कारखाना सर्वच बाजूंनी एक नंबर ठरला आहे.”

“मुलांना चांगले गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी एकही पैसा न घेता शिक्षक घ्यायचे, विद्यार्थ्यांना कोणत्याही मार्गाने न लुबाडता शाळा-कॉलेज चालवायचे, या धोरणाने पैसा मिळाला नसेल, संस्थेचा विस्तार झाला नसेल पण एक वैचारिक बैठक घेऊन संस्था चालवली जात आहे. यात जे मानसिक समाधान आहे ते शिक्षण सम्राट होऊन मिळणार नाही. म्हणून झालेल्या प्रगतीमध्ये आम्ही समाधानी आहोत.”

- अरुण लाड


क्रांती उद्योग

• क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल :-  स्थापना काळापासून अनंत अडचणींवर मात करत कारखान्याची जिद्दीने उभारणी करण्यात अरुणअण्णांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करत कार्यक्षमतेने कारभार करण्यामध्ये आणि अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार मिळविण्यात, शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर देण्यात व एकरी उत्पादन वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नामध्ये अरुणअण्णांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. www.krantisugar.com

• सहकारी पाणी पुरवठा संस्था :-   कुंडल व परिसरातील दहा हजार एकरपेक्षा अधिक शेती क्षेत्रासाठी शाश्वत पाण्याची सोय करणाऱ्या अनेक सहकारी लिफ्ट इरिगेशन संस्थांच्या कार्यक्षम व पारदर्शी कारभारात अरुणअण्णा सतत क्रियाशील आहेत.

• क्रांती दूध संघ :- शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी साहाय्य व्हावे आणि विशेषतः महिलांना कुटुंब चालविण्यासाठी मदत व्हावी या हेतूने क्रांती दूध संघाची स्थापना करण्यात अरुणअण्णांनी पुढाकार घेतला.

• क्रांती गारमेंट :- महिला स्वावलंबी व्हाव्यात, त्यांना कुटुंब चालविण्यासाठी हातभार लागावा विशेषतः आर्थिक दुर्बल व परितक्त्या महिलांना मानाने जगता यावे यासाठी क्रांती गारमेंटची स्थापना व कार्यक्षमतेने चालविण्यामध्ये अरुणअण्णांचा महत्त्वाचा वाटा आहे.


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे नियामक मंडळ संचालक


रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य


क्रांती शिक्षण समूह

• गांधी एज्युकेशन सोसायटीः गोरगरिबांच्या मुलांना प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत कोणत्याही प्रकारचे डोनेशन न घेता प्रवेश व देणगी न घेता नोकरी या तत्त्वाने गांधी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मा. अरुणअण्णांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागात आपला वेगळा ठसा निर्माण केलेली शैक्षणिक संस्था कार्य करत आहे. या संस्थेच्या पुढील शाखा आहेत.
• क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालय, कुंडलः कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या पदवीपर्यंतच्या तसेच बीसीए पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय.
• प्रतिनिधी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुंडलः पाचवी ते दहावी पर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक शिक्षणाची सोय. तसेच तांत्रिक शिक्षणाची आणि कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या उच्चमाध्यमिक शिक्षणाची सुविधा आणि एच.एस.सी. व्होकेशनलच्या अकाउंटिंग फिनान्सियल ऑफिस मॅनेजमेंट, हॉर्टिकल्चर, ऑटो इंजिनिअरींग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी या हातांना कौशल्य देणाऱ्या व्यवसाय शिक्षणाची सोय आहे. या शाखेमध्ये सर्व वर्गामधून एलसीडी प्रोजेक्टरची सुविधा पुरविण्यात आली आहे. तसेच इथे क्रांतिअग्रणी सामाईक प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविले जाते.
• कन्याशाळा, कुंडलः मुलींच्या इयत्ता 8 वी ते 10वी पर्यंतच्या माध्यमिमक शिक्षणाची सोय.
• प्राथमिक विद्यालय, कुंडलः बालवाडीपासून इयत्ता 4थी पर्यंतच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय.
• श्री शिवाजी हायस्कूल, चिंचणी अंबकः इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा.
• ज. म. करपे हायस्कूल, शिरढोण-बोरगावः इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा.
• शहीद सुरेश चव्हाण हायस्कूल, करोलीः इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा.
• यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र, कुंडलः आर्थिक परिस्थितीमुळे व रोजगार-नोकरी करत असलेल्या परंतु शिक्षण घेण्याची जिद्द असणाऱ्या मुलांना नियमित महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही. अशा मुलामुलींना दूरशिक्षणाव्दारे बीए व बीकॉम पदवी शिक्षणाची सोय
• क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलः शिक्षणाचे झालेले खाजगीकरण व बाजारीकरण यामुळे कुवत असूनही केवळ आर्थिक कुवत नाही म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी व गोरगरिबांच्या मुलांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थापना.www.kipskundal.education
• नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह, कुंडलः प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांच्या जन्मदिनी 3 ऑगस्ट, 1947 रोजी वंचितांना राहण्याची उत्तम सोय व्हावी व शिक्षण घेता यावे म्हणून या संस्थेची स्थापना क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड व त्यांच्या अनेक क्रांतिकारक सहका-यांनी केली. शासनाकडून फक्त 96 विद्यार्थ्यांचे अनुदान प्राप्त होत असताना कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी मा. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली या वसतिगृहामध्ये 5 वी ते 10 पर्यंतच्या 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
• प्रोजेक्ट क्रांतीः ग्रामीण भागातील मुलांना कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे शहरामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करता येत नाही आणि योग्य मार्गदर्शनही मिळत नाही. म्हणून कुंडल पंचक्रोशीतील पदवीधर मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी प्रोजेक्ट क्रांती या नावाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अण्णांच्या सहकार्यांने सुरू करण्यात आले आहे. इथे अद्ययावत ग्रंथालय, इंटरनेटसह संगणक कक्ष, प्रसन्न व प्रशस्त अभ्यासिका, व्हिडीओ कॉन्फरसिंग व्दारा तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अनुभव मार्गदर्शकांची नियमित व्याख्याने, साप्ताहिक चाचण्या अशा सर्व सोयीसुविधा सर्वांना मोफत दिल्या जातात. 150 च्यावर मुलेमुली या केंद्राचा लाभ घेत आहेत.
• महिला कौशल्य विकास केंद्रः ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील, वाडीवस्त्यांवरील मुलींचा इच्छा आणि कुवत असूनही त्या प्रगतीपासून दूरच आहेत. प्रगत उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, हाताला काम देणारे व कौशल्य विकसित करणारे प्रशिक्षण शहरातूनच उपलब्ध असल्याने आजही ग्रामीण भागातील मुलींचे पालक मुलींना शहरात पाठविण्यास धजत नाहीत. हे ओळखून मा. अरुणअण्णांच्या मार्गदर्शनाखाली महिला कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे. या केंद्राच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्णत्त्वास जात आहे.

मु.पो.: कुंडल,
ता: पलुस, जिल्हा: सांगली
पिन: - ४१६३०९
फोन: - ०२३४६ - २७१६०१/०२,
ईमेल: - arunlad1947@gmail.com